मनपाच्या अभ्यासिकांची दुरवस्था : विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


- १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा एनएसयूआयचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्पर्धा परीक्षा व विविध अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अभ्यासिका व वाचनालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अभ्यासिकेतील अस्वच्छता, सांडपाण्याची समस्या, दुर्गंधी तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा तुटवडा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचा आरोप एनएसयूआयचे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी केला आहे. येत्या १५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी महापौर संगीता अमृतकर यांनी यापूर्वीच अभ्यासिकेतील समस्यांकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप एनएसयूआयने केला आहे. २८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान धक्कादायक परिस्थिती निदर्शनास आल्याचे बोंडे यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छतागृहातील सांडपाणी थेट अभ्यासिकेत झिरपत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, विद्यार्थ्यांना अशा वातावरणात अभ्यास करावा लागत आहे. त्यातच नवीन अभ्यासक्रमानुसार आवश्यक असलेल्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून कस्तुरबा रोड येथील म. गांधी वाचनालय, सिव्हिल लाईन्स येथील हुतात्मा स्मारक वाचनालय, बाबुपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिका, भानापेठ वॉर्डातील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी अभ्यासिका आणि गंजवॉर्ड येथील श्री कोलबा स्वामी महाराज अभ्यासिका, अशी पाच अभ्यासकेंद्रे चालविली जातात. यापैकी भानापेठ व गंजवॉर्डातील अभ्यासिकांची अवस्था विशेषतः गंभीर झाल्याचा दावा एनएसयूआयने केला आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, संबंधित समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
येत्या १५ दिवसांत अभ्यासिकांमधील स्वच्छता, सांडपाण्याची समस्या, दुर्गंधी आणि पुस्तकांची कमतरता दूर करून सर्व व्यवस्था सुरळीत करण्यात यावी. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आशिष बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनीष दास, सचिन हरणे आणि शुभम रत्नपारखी उपस्थित होते.




Petrol Price




