भरधाव कारच्या धडकेत पाचवर्षीय चिमुकलीचा मृत्यू : महाकालीनगरात शोककळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : घराशेजारी खेळत असलेल्या पाचवर्षीय चिमुकलीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाकालीनगर परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
कृषा प्रशांत गुरमुळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. प्रशांत गुरमुळे हे शहरातील एका प्रतिष्ठित संस्थेत कार्यरत असून, त्यांचे कुटुंब महाकालीनगरातील गल्ली क्रमांक ३ येथे वास्तव्यास आहे.
गुरुवारी रात्री गुरमुळे कुटुंबातील सदस्य घरगुती कामात व्यस्त होते. याचवेळी कृषा घराशेजारी खेळत होती. दरम्यान, अचानक भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या ह्युंदाई ऑरा कारने एमपी २८ झेडसी ७०६० कृषाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कृषा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून गुरमुळे कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कृषाला त्याच कारमधून तातडीने शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
कृषाच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. काही वेळापूर्वीच घराशेजारी खेळणाऱ्या चिमुकलीचा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या आई-वडिलांसह नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाइकांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकांचेही मन हेलावून गेले.
दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांनी कार आणि चालकाला ताब्यात घेतले असून, अपघात नेमका कसा घडला, वाहनाचा वेग किती होता आणि इतर परिस्थिती काय होती, याचा तपास सुरू केला आहे.




Petrol Price




