जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे  तसेच एनआरसीच्या मुद्द्यावरुन कोणत्याही भारतीयाला देश सोडावा लागणार नाही असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली देशात वारंवार वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेल्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. यामध्ये आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून मारहाणीच्या घटना या बाबींचा समावेश आहे.     जातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने हीच देशाची ताकद आहे. सबका साथ, सबका विकास या आमच्या उद्देशानुसार आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. याद्वारे देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी, दलित आणि ओबीसी समाजाचे हित जपणे आमच्यासाठी गरजेचे आहे.  देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत दुर्देवी आहेत. यावरुन कोणीही राजकारण करु नये सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी आपली भुमिका स्पष्ट केली.
आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) बोलताना मोदी म्हणाले, ज्या नागरिकांची नावे या यादीत नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. 
देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, गेल्या वर्षी १ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे सांगताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दाखला दिला आणि या योजनांमुळे रोजगार निर्माण झाले नाहीत का? असा सवाल त्यांनी या मुद्द्यावरुन वारंवार टार्गेट करणाऱ्या विरोधकांना विचारला आहे.   Print


News - World | Posted : 2018-08-12


Related Photos