महत्वाच्या बातम्या

 स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीसांची अवैध गोवंश वाहतुक करणा­यांवर कठोर कारवाई


- १९ गोवंशीय जनावरांसह दोन वाहने जप्त; १९.६५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय व गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत १९ गोवंशीय जनावरांसह एक ट्रक आणि एक महिंद्रा बोलेरो पिकअप अशी दोन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय तसेच गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा गेवर्धा गावाजवळून गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी गेवर्धा ते केशोरी मार्गावर सापळा रचून पाळत ठेवली. यावेळी या मार्गावर ट्रक आणि बोलेरो पिकअप अशी दोन वाहने संशयास्पदरीत्या येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करून दोन्ही वाहने थांबवली व त्यांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून भरल्याचे निदर्शनास आले. संबंधित जनावरांची वाहतूक करण्यासाठी आरोपींकडे कोणताही वैध परवाना किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत ट्रक क्रमांक टीजी १२ यू ४८९६ या अशोक लेलँड वाहनातून ११ गायी व २ बैल, अशी एकूण १३ जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ८५ हजार रुपये, तर ट्रकची अंदाजे किंमत १२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३५ एजे ६४०१ या वाहनातून ४ गायी व २ बैल, अशी एकूण ६ गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे.

अशा प्रकारे दोन्ही वाहनांमधून एकूण १९ गोवंशीय जनावरे, त्यांची अंदाजे किंमत २ लाख ६५ हजार रुपये, तसेच दोन वाहनांची एकूण अंदाजे किंमत १७ लाख रुपये, असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी शेख इब्राहिम शेख इस्माईल (वय ४०, रा. मेहबुब नगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर) आणि मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (वय २५, रा. चिराग अली चौक, टेका नई बस्ती, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(अ), ११(१)(ड), ११(१)(इ), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. विश्वंबर कराळे, पोअं. तुषार खोब्रागडे, चापोअं. गणेश, परि. पोउपनि. कुणाल रेगुलवार, पोहवा. अजीतकुमार सुरजुसे आणि नापोअं. अमोल आलाम यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

गडचिरोली जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा बेकायदेशीर वाहतुकीवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





  Print






Related Photos