ग्रामसभेच्या कामकाजावर अनिश्चित काळासाठी बहिष्कार


- ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मृत्यूचा निषेध : विविध मागण्यांसाठी अधिकारी संघटना आक्रमक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामविकास अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन आणि विस्तार अधिकारी संघटनेने अनिश्चित काळासाठी ग्रामसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत घुगल यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ग्रामसभेचे कामकाज करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामसभेसाठी स्वतंत्र सचिवाची मागणी -
ग्रामसभेच्या कामकाजासाठी शासनाने स्वतंत्र सचिवाची नियुक्ती करावी, ग्रामसभेशी संबंधित नियमांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात आणि ग्रामसभांची संख्या कमी करावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. तसेच ग्रामसभांच्या बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे आणि ग्रामसभा घेण्यासाठी जाणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
अधिकारी सुरक्षेच्या प्रश्नावर आक्रमक -
ग्रामसभा आणि शासकीय कामकाज पार पाडताना अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव किंवा हल्ल्याच्या घटना घडत असल्यास त्याचा थेट परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी प्रशांत घुगल, उपाध्यक्ष भावना नेहारे, सचिव पुरुषोत्तम बल्की, सहसचिव मंदा राऊत, कोषाध्यक्ष नाना कुडे, नरेश मठ्ठानी, जितेंद्र डवरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मृत्यूसारख्या गंभीर घटनेनंतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




