

- मनसर उड्डाणपुलावरील अपघातात मित्र गंभीर जखमी; धडक देऊन वाहनचालक पसार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील उड्डाणपुलावर वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना बुधवारी २६ आगस्ट सायंकाळी साडेचारच्या सुमारास रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशिष सहानी (२६) असे मृत तरुणाचे नाव असून, शेषमणी निषाद (२५) हा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. दोघेही रामटेक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष सहानी आणि शेषमणी निषाद हे दोघे मित्र बुधवारी सायंकाळी एमएच-४०/एए-४३२५ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरहून बोराडा येथे जात होते. मनसर ता. रामटेक येथील उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी पोहोचली असता मागून नागपूरच्या दिशेने जबलपूरकडे वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धडक देणारे वाहन न थांबता घटनास्थळावरून वेगाने निघून गेले. काही वेळातच गंभीर जखमी झालेल्या आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेषमणी हा गंभीर जखमी अवस्थेत होता.
अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी प्रवीण मरसकोल्हे, संजेश मडावी आणि प्रवीण मते तसेच पोलिस पाटील विमलेश केहाडे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी व पंचनामा केला. त्यानंतर आशिषचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला, तर गंभीर जखमी शेषमणीला उपचारासाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अज्ञात वाहनाचा शोध सुरू -
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याने पोलिसांसमोर अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
मनसर उड्डाणपुलावर भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या या धडकेत एका तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गंभीर जखमी शेषमणीवर उपचार सुरू असून, अपघातातील फरार वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.




Petrol Price




