महत्वाच्या बातम्या

 मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते वॉशमित्र उद्योजकांना आवश्यक साहित्याचे वाटप


- वॉशमित्र प्रकल्पाचे उदघाटन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : बहुतांश सरकारी शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत, जेथे आहेत तेथे दुरुस्ती होत नाही. परिणामी, शाळेतील मुलामुलींची कुचंबना होते. ही बाब लक्षात घेता युनिसेफ व सीवायडीए संस्था पुणे यांच्यावतीने वॉशमित्र हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता. या तरुण वॉश उद्योजकांना मार्गदर्शन व साहित्यांचे वाटप जिल्हा परिषद सीईओ कुमार आशिर्वाद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नवउद्योजकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा वॉश मित्र हा उपक्रम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या वॉश मित्रांना ग्रामपातळीवर शाळा, रुग्णालये, अंगणवाडी या ठिकाणच्या पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधांची देखरेख, देखभाल दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. नामांकित संस्थेच्या माध्यमातून प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, मेसन (बांधकाम), आरओ फिटिंग, कारपेंटर आदी विषयांवरील प्रशिक्षण या वॉशमित्रांना युनिसेफ, सीवायडीएमार्फत देण्यात आले. या अनुषंगाने, गडचिरोली जिल्ह्यातील तरुण वॉश उद्योजकांना मार्गदर्शन व नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कुमार आशिर्वाद यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे पार पडला. यावेळी सीईओ कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते या वॉशमित्रांना आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वॉशमित्रांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, सरकारी रुग्णालये इत्यादींना देखभाल व दुरुस्तीच्या सेवा प्रदान करण्यात येणार आहे.  सूत्रसंचालन आणि प्रस्तावित CYDA गडचिरोली जिल्हा समन्वयक  कमलाकर मांडवे यांनी केले. तसेच संतोष तेलंगे आणि स्वप्नील बांबोळे व 6 वाशमित्र उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos