महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहाराची चौकशी करा : मंत्री दिलीप वळसे पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहाराची चौकशी गतीने पूर्ण केली जाईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सहकार मंत्री वळसे पाटील पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुदत २०१७ मध्ये संपली आहे. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ही स्थगिती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत सहकार कायद्यानुसार बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेता येणार नाही आणि त्या बँकेवर प्रशासक सुद्धा नेमता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संचालक मंडळ कायम राहील. या बँकेच्या संचालकांवरील गुन्ह्यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीमधून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका तपासली जात असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी गतिमान पद्धतीने पूर्ण केली जाईल. आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिट सुद्धा केले जाईल. त्याचा निर्णय साधारणतः एक महिन्याच्या आत येईल. टेस्ट ऑडिट झाल्यानंतर सर्व बाबींची चौकशी करून उच्च न्यायालयातील स्थगिती उठल्यानंतर बँकेच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos