आज गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात १५ नामांकन दाखल, उद्या नामांकनांचा पाऊस पडणार


- विविध पक्ष रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी तिनही विधानसभा क्षेत्रात १५ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तर ५४ नामांकन अर्जांची उचल करण्यात आली आहे. उद्या ४  ऑक्टोबर नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांद्वारे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. तसेच उद्या सर्वच उमेदवार नामांकन दाखल करणार असून नामांकनांचा पाउस पडणार आहे.
आज आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे उमेदवार कृष्णा दामाजी गजबे यांनी दोन नामांकन दाखल केले. काॅंग्रेसचे उमेदवार आनंदराव गंगाराम गेडाम यांनी एक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप हरीदास परचाके यांनी दोन असे पाच नामांकन दाखल झाले आहेत.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष सागर भारत कुंभरे, वंचित बहुजन आघाडीचे गोपाल काशिनाथ मगरे यांनी प्रत्येकी एक, भारतीय जनता पार्टीचे डाॅ. देवराव मादगुजी होळी यांनी दोन नामांकन दाखल केले आहे. संभाजी ब्रिगेडचे उमेदवार दिलीप किसन मडावी यांनी तीन नामांकन दाखल केले आहे तर काॅंग्रेसच्या उमेदवार डाॅ. चंदा नितीन कोडवते यांनी एक  आणि अपक्ष चांगदास तुळशिराम मसराम यांनी एक नामांकन दाखल केले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ९ नामांकन दाखल झाले आहे. 
अहेरी विधानसभा क्षेत्रात आज ८  नामांकन अर्जांची उचल करण्यात आली. यापैकी भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाकडून माजी आ. दीपक आत्राम यांनी नामांकन दाखल केले आहे. दीपक आत्राम यांनी १ ऑक्टोबर रोजी अपक्ष म्हणून एक नामांकन दाखल केले होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-03


Related Photos