महत्वाच्या बातम्या

 अनाथांच्या आरक्षणात बदल करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील अनाथांना एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. त्यात सकारात्मक बदल करण्याची गरज असून येत्या काळात अनाथ आरक्षणात बदल करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर्पण युवा पुरस्कार प्रदान समारंभात दिली.

फडणवीस म्हणाले की, शासकीय पद्धतीमध्ये अनाथांचे क्षेत्र दुर्लक्षित राहू नये यासाठी राज्य शासनाने अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न उद्भवले होते त्यांचे निराकरण करुन हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने काही बदल करण्याची गरज आहे. येत्या काळात तसे बदल देखील करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तर्पण फाऊंडेशनतर्फे १८ वर्षावरील अनाथांना सुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाच्या व्यवस्थेबरोबर काम करण्यासाठी राज्य शासनाने तर्पण फाऊंडेशनसमवेत सामंजस्य करार केला. या मुलामुलींना तर्पण संस्थेकडून आवश्यक सुविधा आणि संस्थात्मक संरक्षण दिले जाते. अशा चांगल्या कामांना पाठबळ दिले पाहिजे. अनाथांसाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन आहे, असेही फडणवीस यांनी आश्वस्त केले.

भगवानगडावर शंभर अनाथ मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनाथांसह त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत महंत डॉ. शास्त्री यांनी व्यक्त केले. प्रारंभी तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी तर्पण फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेतून अनाथांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्याबद्दल अनाथ मुलामुलींनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार नितेश राणे, भूमी वर्ल्डचे संचालक प्रकाश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos