जात पडताळणी समितीने जाणल्या नाथजोगी समाजाच्या अडचणी
- जात प्रमाणपत्राचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सामाजिक न्याय पर्व - २०२३ अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. सचिन मडावी यांनी लाखांदूर तालुक्यातील कोदामेडी येथील नाथजोगी समाजाच्या वस्तीला भेट देवून त्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय भंडारा मार्फत १ एप्रिल ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत विविध कार्यक्रम व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय पर्व हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा येथे नाथजोगी समाजातील विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र त्या अर्जात अनेक त्रुट्या आढळत आहेत. जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. सचिन मडावी, पोलीस निरीक्षक गिरी व इतर कर्मचारी यांनी लाखांदूर तालुक्यातील नाथजोगी समाजाच्या वस्तीला भेट दिली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. समितीच्या पदाधिकान्यांनी त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांना तसेच पालकांना जात वैधता प्रमाणपत्राचे महत्त्व समजावून सांगून त्या संबंधी मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नाथजोगी समाजाचे नागरीक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
News - Bhandara