महत्वाच्या बातम्या

 राखीपौर्णिमेसाठी कुटुंब गोंदियाला गेले अन् चोरट्यांनी घर फोडले : ३.६७ लाखांचा ऐवज लंपास


- ९० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने व घड्याळ चोरीला; राणा प्रतापनगर पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राखीपौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी कुटुंबासह गोंदिया येथे गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे मुख्य दरवाजाचे कडी-कोंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी ९० हजार रुपये रोख, सोन्याचे विविध दागिने आणि घड्याळ असा एकूण ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना राणा प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्तीनगर येथील एमआयजी कॉलनीत घडली. या प्रकरणी नरेंद्र वसंत शर्मा ६१ वर्षे यांनी राणा प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शर्मा हे त्रिमूर्तीनगर येथील एमआयजी कॉलनीत कुटुंबासह राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र शर्मा हे २६ ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह राखीपौर्णिमेनिमित्त गोंदिया येथे बहिणीकडे गेले होते. ते ३० ऑगस्टपर्यंत बाहेर होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा व कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममध्ये जाऊन तेथील अलमारीची झडती घेतली. अलमारीत ठेवलेली ९० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि एक घड्याळ असा एकूण ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी शर्मा कुटुंबीय गोंदियाहून परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर अलमारीतील रोकड व दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नरेंद्र शर्मा यांनी तातडीने राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल -
शर्मा यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून चोरीच्या घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. तसेच चोरट्यांनी घराची पूर्वीपासून रेकी केली होती का, याचाही तपास केला जात आहे. सणानिमित्त घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याची संधी साधून घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






Related Photos