कुष्ठरोगाचे लवकर निदान, त्वरित उपचारासाठी २८ सप्टेंबरपासून शोध अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात कुष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने बहुविध औषधोपचार (MDT) सुरू करण्यासाठी कुष्ठरोग शोध अभियान (LCDC) २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या १४ दिवसीय अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील जोखमीच्या क्षेत्रांमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील कुष्ठरोगाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अभियानाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अभियानादरम्यान आरोग्य विभागाची पथके घरोघरी भेट देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगाबाबत तपासणी करणार आहेत. संशयित रुग्णांचा शोध, घरभेटी, संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी, निदान झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करणे तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क -
कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करता येतात आणि विकृती व अपंगत्व टाळता येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे, त्वचेवर गाठी येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, सुन्नपणा अथवा नसांशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सर्व घटकांच्या सहभागाचे आवाहन -
सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच सर्व संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी तसेच नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. लवकर शोध - त्वरित उपचार - विकृतीपासून संरक्षण या उद्देशाने कुष्ठरोग शोध अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.




Petrol Price




