महत्वाच्या बातम्या

 ड्युटीवर गेला अन् परतला तेव्हा घर लुटलेले : वरोरात दिवसाढवळ्या तीन लाखांचे दागिने चोरीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला दुपारी घरी परतल्यानंतर मोठा धक्का बसला. घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना वरोरा येथील सहारा पार्क परिसरात घडली. सहारा पार्क येथील सौरभ अनिल कटाईत ३० हे समुद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आई-वडील चिमूर येथे नातेवाईकांकडे गेले होते.

त्यामुळे सौरभ सकाळी सुमारे ७.३० वाजता घराला कुलूप लावून कर्तव्यावर समुद्रपूर येथे गेले. दुपारी सुमारे १.१५ वाजता घरी परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात प्रवेश केल्यावर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरूममधील कपाट उघडे होते. कपाटाची पाहणी केली असता सुमारे ५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोफ, ठुशी, झुमके, अंगठ्या, पोत आदी दागिने तसेच दोन हजार रुपये रोख गायब असल्याचे समोर आले.

दिवसा घर फोडून झालेल्या या चोरीमुळे परिसरातही खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती सौरभ यांनी आपल्या आई-वडिलांसह वरोरा पोलिसांना दिली. वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.





  Print






Related Photos