गडचिरोली जिल्ह्याचा विकास केव्हा होणार ?


- सर्वसामान्य जनतेचा प्रश्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अविकसित अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसली गेली नाही. अद्यापही या जिल्ह्यात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने जिल्हावासियांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला असून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज, रस्ते, शिक्षण आदी सुविधांची पूर्तता झालेली नसल्याचे दिसून येत आहे. वीज पोहचलेली नसल्याने अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. शिक्षण व आरोग्याच्या सुविधा देखील फारशा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे या जिल्ह्याचा विकास केव्हा होणार ? असा प्रश्न जिल्हावासियांकडून उपस्थित केला जात आहे.
देशातील अतिमागास व अविकसित जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये अद्यापही पक्के रस्ते बनविण्यात आलेली नसल्याने दळणवळणाच्या सुविधा देखील उपलब्ध होवू शकल्या नाहीत. त्यामुळे आजही अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क होत नाही. पक्क्या रस्त्यांअभावी अनेक गावातील लोकांना जंगलातील वाटेने पायदळ वाट काढावी लागत आहे. शिवाय शिक्षण व आरोग्याच्या सोयींचा सुद्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये स्वातंत्रयानंतरही शिक्षणाची सुविधा नाही. गावात शाळा नसल्याने शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील लोक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्याच्या सुविधा सुद्धा गावापर्यंत पोहचत नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाा आहे. आरोग्याच्या सोयीसुविधांअभावी अनेकजण आजारामुळे घरीच खितपत पडत असतात आणि अनेकजण मृत्यूला कवटाळत असतात. दळणवळणाच्या सुविधांअभावी दुर्गम भागातील लोकांना खाटेवर मांडून रुग्णालयापर्यंत आणल्या जात असते. त्यामुळे अनेकांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू होत असल्याची विदारक परिस्थिती येथे दिसून येत आहे.
गडचिरोली या आदिवासीबहूल व नक्षलग्रस्त जिल्ह्यात अद्यापही मोठे उद्योगधंदे स्थापन झाली नाही. शिवाय शेती व्यवसायाव्यतिरिक्त इतर फारसे काम हाताला मिळत नसल्याने बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. या बेरोजगारीमुळेच अनेक युवके व्यसनाधिनतेकडे व इतर गैरमार्गाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नक्षलवादामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला जात आहे तर दुसरीकडे विकास नाही म्हणून जिल्ह्यात नक्षलवाद फोफावत असल्याचे म्हटल्या जाते. जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसला असतानाच भ्रष्टाचार देखील या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात एकमेव सुरजागड लोहखनिज प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र त्या उद्योगाला देखील फारशी गती मिळाल्याचे दिसून येत नाही. याकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष देवून सुरजागड प्रकल्पाच्या कामाला गती देवून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्या प्रकल्पात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हावासियांकडून जोर धरत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत छोटे-मोठे उद्योग स्थापन करण्यासाठी शासनाच्यावतीने भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी सुद्धा फारसे उद्योग सुरू होवू शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या गंभीर होत आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, सिंचनाच्या सुविधांचा सुद्धा या जिल्ह्यात अभाव आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने जंगलव्याप्त व दुर्गम भागातील नागरिकांना झरे, कुवा, नदी-नाल्याचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या भेडसावून अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणारया लांब नद्या व उपनद्या असताना सुद्धा नियोजनाअभावी त्यावर बांध घालण्यात न आल्याने नदी-नाल्यांचे पाणी वाहून जात आहेत. परिणामी सिंचनाच्या सुविधांअभावी जिल्ह्यातील शेतकरयांना वर्षातून केवळ एकच पीक घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसलयाचे दिसून येत आहे. अशा विविध समस्या व अडचणींमुळे आदिवासीबहुल व अविकसित म्हणून असलेली गडचिरोली जिल्ह्याची ओळख केव्हा पुसल्या जाणार व या जिल्ह्याचा केव्हा विकास होणार ? असा प्रश्न जिल्हावासियांकडून विचारल्या जात आहे. याकडे आतातरी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष देवून जिल्ह्यातील समस्यांची पूर्तता करून सर्वांगीण विकासाकरिता ठोस पाऊल उचलून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-23


Related Photos