जन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा


वृत्तसंस्था /  नवी दिल्लीः   गरीब-दुर्बल घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या मुख्य उद्देशानं सुरू झालेल्या 'प्रधानमंत्री जन-धन योजने'ला येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी  चार वर्षं पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने, जन-धन खातेधारकांसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून  मोठी घोषणा करणार असल्याचे   खात्रीलायक वृत्त आहे. 
जन-धन खातं सहा महिने योग्य प्रकारे चालू राहिल्यास खातेदाराला बँकेकडून ५ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. ही मर्यादा वाढवून थेट दुप्पट - म्हणजेच १०  हजार रुपये करण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यासोबतच, पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मायक्रो इन्शूरन्स स्कीमची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. रुपे कार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत दुर्घटना विम्याची रक्कम 1 लाख रुपयांनी वाढवण्याचा विचारही सरकार करतंय, असं सूत्रांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी 'सव्वा सौ करोड' देशवासीयांसाठी महत्त्वाकांक्षी जन-धन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, २८ ऑगस्टला ही योजना प्रत्यक्षात सुरू झाली होती. जन-धन खातं कुठलाही भारतीय नागरिक उघडू शकतो. परंतु, गरीब, दुर्बल घटकांना सरकारी योजनांद्वारे मिळणारी रक्कम थेट त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा हा या योजनेचा मुख्य हेतू होता. गेल्या चार वर्षांत ३२ कोटी २५  लाख जन-धन खाती उघडण्यात आली असून त्यात ८० हजार ६७४ कोटी रुपये जमा आहेत.  Print


News - World | Posted : 2018-08-12


Related Photos