महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा : रोज जाणवत आहे १ कोटी अंड्यांची कमतरता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात रोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. यानंतर पशुसंवधर्न विभागाकडून अंड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून यासाठी नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

महाराष्ट्रात दिवसाला 2 कोटी 25 लाख अंड्यांचे सेवन केले जाते.

महाराष्ट्रात दिवसाला १ ते १.२५ कोटी अंडी उपलब्ध होतात. दरम्यान वाढती मागणी लक्षात घेता पशुसंवर्धन विभाग नवीन योजना आखत आहे. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धनंजय यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. सध्या राज्यातील तुटवडा लक्षात घेता कर्नाटक, तेलंगण आणि तामिळनाडूमधून अंडी खरेदी केली जात असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला २१ हजारांच्या अनुदानित दराने 50 व्हाईट लेघॉर्न कोंबड्यांचे 1,000 पिंजरे देण्याची योजना आखत आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. यासंबंधी पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास राज्यातील अंड्यांचा तुटवडा कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादमध्ये गेल्या दोन महिन्यात अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये 100 अंड्यांसाठी 575 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून 100 अंड्यांची किंमत 500 पेक्षा जास्त आहे, अशी माहिती होलसेलर अब्दुल वाहिद शाह यांनी दिली आहे.

मुंबईतही अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत एक डझन अंड्यांसाठी ९० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या २ आठवड्यांत अंड्याच्या दरात एका डझनमागे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे.

नॅशनल इग कोऑर्डिनेशन कमिटीनुसार, अंड्यांचा किरकोळ दर ७८ रुपये आहे. त्यावर विक्रेते ६ ते १० रुपये आकारतात. शनिवारी घाऊक बाजारात १०० अंड्यांचा दर ६२६ रुपये इतका होता.





  Print






News - Rajy




Related Photos