गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या १० सदस्यांच्या निवडीला शासनाची स्थगिती : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ


- अवघ्या २३ दिवसांतच निर्णय फिरवला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित अशा एकूण १० जणांच्या नियुक्तीला राज्य शासनाने गुरुवारी २६ तडकाफडकी स्थगिती दिली आहे. अवघ्या २३ दिवसांपूर्वीच या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली होती. शासनाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती रचना व कामे अधिनियम, १९९८ मधील तरतुदींनुसार, राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी एक शासन निर्णय जारी केला होता.
या निर्णयान्वये विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून २ नामनिर्देशित सदस्य आणि ८ विशेष निमंत्रित अशा एकूण १० व्यक्तींची गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लावण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीनंतर अवघ्या तीन आठवड्यांतच नियोजन विभागाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांच्या स्वाक्षरीने २६ नोव्हेंबर रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, यापूर्वी मान्यता देण्यात आलेल्या सर्व १० व्यक्तींच्या नामनिर्देशनास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव यांना देण्यात आले आहेत.
नेमक्या कोणत्या कारणाने स्थगिती? -
नियोजन विभागाने काढलेल्या शासन निर्णयात स्थगिती देण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त्यांना अचानक ब्रेक लागल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत धुसफूस की तांत्रिक कारण, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




Petrol Price




