महत्वाच्या बातम्या

 फाशी ही क्रूर शिक्षा : सुप्रीम कोर्टाने पर्याय शोधण्याचे केंद्राला दिले निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : कैद्याला फासावर लटकवण्याऐवजी मृत्युदंड म्हणून दुसरी शिक्षा देता येऊ शकते का, याचा विचार केंद्र सरकारने करावा आणि तज्ञांची समिती नेमून कमी वेदनेचा दुसरा पर्याय सुचवावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केले.

फासावर लटकवल्यानंतर त्या कैद्याचा मृत्यू व्हायला किती वेळ लागतो? फाशीमुळे किती वेदना होतात? याबाबत मोठ्या रुग्णालयांतील तज्ञांकडून शास्त्रीय डाटा मिळवून तो न्यायालयापुढे सादर करा, असे निर्देशही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यावेळी दिले.

देशातील सध्याची फाशी देण्याची पद्धत अत्यंत क्रूर आहे, असा दावा करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. कैद्याला फासावर लटकवल्यामुळे प्रचंड वेदना होऊन त्याचा मृत्यू होतो. त्याऐवजी गोळीबार, प्राणघातक इंजेक्शन किंवा विजेचा शॉक देऊन मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी सूचना याचिकेत केली आहे. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारला फाशीच्या शिक्षेला दुसरा कमी वेदनेचा पर्याय सुचविण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात तज्ञांची समिती स्थापन करून फाशीऐवजी कमी वेदनेच्या दुसऱ्या पर्यायाचा विचार करा, अशी सूचना न्यायालयाने ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामन यांना केली. याप्रकरणी २ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos