४८ तासात दुसऱ्यांदा पूर , भामरागडला पुन्हा बेटाचे स्वरूप, नागरिकांचे हाल


- सरकारला येईना जाग, नेहमीच्या संकटाने नागरिक वैतागले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्याला पावसाचा मोठा फटका सहन करावा लागत असून ४८ तासात दुसऱ्यांदा भामरागडला बेटाचे स्वरूप आले आहे. नदी नाल्यांना पूर आला असल्यामुळे तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड नजीकच्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पुर येत आहे. यामुळे कधी पूर ओसरतो तर कधी चढतो. पर्लकोटा नदीचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये शिरत आहे. यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. सोबतच सामान इतरत्र हलविण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. सध्या पर्लकोटा नदीचे पाणी गावामध्ये तुडूंब भरले आहे. यामुळे संपूर्ण रहदारी बंद पडली आहे. 
तालुक्याच्या नशिबी आलेल्या कमी उंचीच्या पुलांमुळे नागरिक वैतागले आहेत. नेहमीच पावसाळ्यात मार्ग बंद होत असतात. अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. काॅंग्रेसच्या काळात पुलांचा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारकडून तरी पुलांचा प्रश्न मिटेल अशी आशा जनतेला होती. मात्र ही आशा मावळली असून पुराचा फटका नेहमीच सहन करण्याची पाळी भामरागडवासीयांच्या नशिबी आली आहे. 
१३ आॅगस्ट रोजी पूर आल्यामुळे मार्ग  बंद झाला होता. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. हा कचरा रात्रीच तहसीलदार अंडील यांनी स्वतः उपस्थित राहून हटविला आणि रहदारीस रस्ता मोकळा केला होता. तेव्हापासून पुन्हा - पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होत असून नानाविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.
पुरामुळे आरोग्य सेवासुध्दा ऐरणीवर आली आहे. एखाद्या गंभीर रूग्णाला मोठ्या रूग्णालयांमध्ये रेफर करायचे असल्यास कसे करायचे हासुध्दा प्रश्न आहे. यामुळे जीव गमावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अशा अनेक समस्यांमुळेच शासकीय कर्मचारीसुध्दा भामरागड येथील मुख्यालयी राहत नाहीत. विकासाच्या दृष्टीनेच भामरागड तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र रस्तेच अडून राहत असतील तर विकास कुठून येणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. भामरागड तालुक्याशी कोणालाच काही देणे - घेणे नाही काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. वर्षानुवर्षे भामरागड तालुक्यातील जनतेचे जगणे कठीण होत जात आहे.

पोलिस विभागाची सुरक्षितस्थळी राहण्याची सुचना

पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठाणेदार सुरेश मदने यांनी दुकानदार तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक दुकानदारांना नोटीस देवून पूर असल्यामुळे दुकाने बंद ठेवून सुरक्षितस्थळी राहावे, अशा सुचना दिल्या आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos