रक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रुग्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान


-  तुरुंगात राहून आलेल्यांनाही यापुढे रक्तदान करण्यास मज्जाव 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राष्ट्रीय रक्त संक्रमण समिती (नॅको)ने रक्तदानाच्या संदर्भातील नियमावलीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. मलेरिया झालेल्या रुग्णांची एक वर्ष रक्तदान न करण्याची अट आता अधिक कडक करण्यात आली आहे. हा कालावधी आता तीन वर्षावर नेण्यात आला आहे. रक्तदानाच्या वेळी रक्ताच्या माध्यमातून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढते प्रमाण लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. 
नवीन नियमानुसार तुरुंगात राहून आलेल्यांनाही यापुढे रक्तदान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. समलैंगिक व्यक्तींनाही रक्तदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. नॅकोने ही नियमावली राज्य रक्त संक्रमण समितीकडे पाठवली आहे.  प्रदेशनिहाय प्रत्येक वर्षी विविध प्रकारच्या साथींचे आजार डोके वर काढतात, त्यातून संसर्गही वाढता असतो. उपचारांना दाद न देणाऱ्या प्रतिजैविकांचा वापरही वाढता आहे. याचा विचार करून काही ठराविक कालावधीनंतर रक्तदानासंदर्भात नव्या निकषांचा अंतर्भाव नियमावलीमध्ये करण्यात येतो. केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या या नियमावलीमध्ये क्षयरोगाचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
तुरुंगवास झालेल्या व्यक्तींमधील रोगप्रतिकारशक्ती, तेथे मिळणारा आहार, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता या व्यक्तींना रक्तदान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मलेरिया झाल्यानंतर तीन वर्षे रक्तदान करता येणार नाही. 
रक्तदान करताना दात्याला काही प्रश्न विचारून त्याची नोंद केली जाते. या प्रश्नावलीमध्ये मागली सात दिवसांमध्ये प्रतिजैविके घेतली आहेत का, डॉक्टरांनी लिहून न दिलेले नारकोटिक्ससारखे इंजेक्शन घेतले आहे का, गोंदण किंवा अॅक्युपंक्चर पद्धतीचा वापर केला होता का, तसेच महिलांसाठी मागील सहा महिन्यात गर्भपात झाला होता, याचेही उत्तर नोंदवावे लागणार आहे. काखेत, जांघेत वा मानेमध्ये मोठी गाठ असल्यास व रात्री सातत्याने घाम येत असल्यास, वजनामध्ये घट होणाऱ्या व्यक्तींनाही माहिती द्यावी लागणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-28


Related Photos