महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी स्मृती वर्षानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०२६-२७ हे वर्ष महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी स्मृती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याअनुषंगाने समाज कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक जाणीव-जागृती व सांस्कृतिक विकास व्हावा या उद्देशाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) मनीषा कुरसंगे, कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार याची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत कार्यरत एकूण २९ अनुदानित वसतिगृहातील शालेयस्तर इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात महाड सत्याग्रह: सामाजिक क्रांतीची नांदी या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण केसरीमल कन्या विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका योगेश्वरी वानखडे, पल्लवी वखरे आणि समाजभूषण पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक राजू थूल यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याहस्ते प्रथम पुरस्कार ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये व तृतीय पुरस्कार १ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. यावेळी पराग सोमण यांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास कसा साधावा याबाबत स्वअनुभवातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला अनुदानित वसतिगृहांचे अधीक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांच्या नेतृत्वात समाज कल्याण विभागाद्वारे करण्यात आले, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे




Petrol Price




