'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान


- जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोलिस विभागाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘विकास दौड’ स्पर्धेत ५६५  विद्यार्थ्यांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनीसुध्दा सहभाग घेतला होता.
 गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्र स्तरावर जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दृष्टीने मागील १५   दिवसांपासून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम पाच क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींसह ५६५  विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला होता.
सकाळी ८  वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातून  दौड ला सुरूवात करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलिस बलाचे पोलिस उपमहानिरीक्षक टी. शेखर, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दौड स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखविली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, केंद्रीय राखीव पोलिस बलाचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौडचा समारोप पोलिस मुख्यालयात करण्यात आला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मुले व मुली गटात प्रथम आलेल्या स्पर्धकास प्रत्येकी १०  हजार रूपये, शिल्ड आणि पुष्पगुच्छ, द्वितीय ७ हजार ५००  रूपये, शिल्ड आणि पुष्पगुच्छ, तृतीय क्रमांकास ५  हजार रूपये रोख, शिल्ड व पुष्पगुच्छ तसेच दोन्ही गटात प्रत्येकी ३ उत्तेजनार्थ पोरितोषिक म्हणून १ हजार रूपये रोख, शिल्ड व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-09


Related Photos