चंद्रपूरच्या पक्षीवैविध्यात नवा पाहुणा : कॉलर्ड प्रॅटिनकोलचे प्रथमच दर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्याच्या समृद्ध पक्षीवैविध्यात एका नव्या पक्ष्याची भर पडली असून, कॉलर्ड प्रॅटिनकोल (Collared Pratincole) या दुर्मिळ पक्ष्याची चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच नोंद करण्यात आली आहे. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव Glareola pratincola असून, मराठीत त्याला कठेरी आर्ली किंवा कठेरी पाणभींगरी असे संबोधले जाते. वन्यजीव अभ्यासक तथा कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर आणि वनरक्षक पत्रू कावळे यांनी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी कोठारी वनपरिक्षेत्रात या पक्ष्याचे निरीक्षण करून त्याचे छायाचित्रण केले.
कॉलर्ड प्रॅटिनकोल हा ग्लेरिओलिडी (Glareolidae) कुळातील पक्षी असून, प्रामुख्याने पाणथळ जागा, नदीकाठ आणि पाणथळ परिसरालगतच्या मोकळ्या गवताळ प्रदेशात आढळतो. उडताना हवेतच कीटक पकडण्याची त्याची अनोखी पद्धत लक्षवेधी असते. स्थलांतराच्या काळात हा पक्षी भारतात दाखल होतो.
या नोंदीबाबत माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांनी सांगितले की, जागतिक ऑनलाइन पक्षी निरीक्षण व नोंदणी व्यासपीठ असलेल्या ई-बर्डनुसार विदर्भात या पक्ष्याच्या अत्यंत कमी नोंदी आहेत. यापूर्वी अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांत या पक्ष्याची नोंद झाली आहे. कोठारी वनपरिक्षेत्राचे जंगल कन्हारगाव वन्यजीव अभयारण्याला लागून असून, येथील नैसर्गिक अधिवास पक्ष्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, हे या नव्या नोंदीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
या पक्ष्याची नोंद ई-बर्ड या जागतिक ऑनलाइन व्यासपीठावर करण्यात आली आहे. ई-बर्डच्या नोंदीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४३ पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पक्षीवैविध्य अधिक समृद्ध करण्यासाठी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी पक्षिप्रेमी, स्थानिक नागरिक आणि वन विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




