धानपीक करपले, कर्जाचा डोंगर फेडायचा कसा? ३६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

- पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनाची आशा मावळली; सोसायटी, बचत गट आणि बँकेचे अडीच ते तीन लाखांचे कर्ज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे झालेले नुकसान, पावसाच्या अनियमिततेमुळे करपलेले धानपीक आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा या आर्थिक विवंचनेतून चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील ३६ वर्षीय शेतकरी सचिन भाऊजी सातपूते यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपविले. या घटनेमुळे भेंडाळा परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबांपुढील आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सचिन सातपूते हे मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजताच्या दरम्यान शेतावर गेले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेचा त्यांच्या शेतीला मोठा फटका बसला. पावसाने दडी मारल्याने शेतातील धानपीक पाण्याअभावी करपून गेले. त्यामुळे यंदा अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा मावळली होती. शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक व्यवहार कसे भागवायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.
दरम्यान, शेतीच्या मशागतीपासून पीक लागवडीपर्यंत विविध कामांसाठी त्यांनी सोसायटी, बचत गट आणि बँकेकडून अडीच ते तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, धानपीक हातचे गेल्याने हे कर्ज फेडायचे कसे, आगामी हंगामासाठी आर्थिक तरतूद कशी करायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशा अनेक चिंतांनी ते त्रस्त होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
पावसाच्या अनियमिततेने शेतकरी संकटात -
चामोर्शी तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला पावसाची प्रतीक्षा आणि त्यानंतर पावसाने घेतलेली दडी यामुळे अनेक ठिकाणी धानपिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिकांसाठी केलेला खर्च, खते-बियाण्यांचा वाढता दर आणि अपेक्षित उत्पादन न मिळण्याची भीती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
दुसरीकडे, गडचिरोली जिल्ह्यात विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेवरूनही शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. जमिनीचा योग्य मोबदला, शेतीचे भवितव्य आणि पर्यायी उपजीविकेचे साधन यांसारखे प्रश्न ग्रामीण भागात चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान आणि कर्जबाजारीपणा यांचा एकत्रित परिणाम शेतकरी कुटुंबांवर होत असल्याचे चित्र आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर -
सचिन सातपूते यांच्या निधनाने भेंडाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुण शेतकऱ्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई आणि कर्जाच्या संकटातून दिलासा देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.




Petrol Price




