महत्वाच्या बातम्या

 घनकचरा व्यवस्थापनाचा देशातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प नागपुरात होणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया व व्यवस्थापन या संदर्भातील प्रकल्प नागपूरमध्ये नेदरलँडची कंपनी सुरू करणार आहे. यासंदर्भात रविवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नागपुरात होणारा हा अशाप्रकारचा देशातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल, असा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून विशेषत: नागपूरमध्ये येण्याची शक्यता असणारे काही प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने नागपूरकरांसह वैदर्भीयांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील घनकचऱ्यांच्या संदर्भातील मोठ्या प्रकल्पाची घोषणा फडणवीस यांच्याकडून करण्यात आली. रविवारी फडणवीस यांनी नेदरलँड येथील एसयूएसबीडीई (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेन्ट) कंपनीचे अध्यक्ष जॉप व्हीनेनबॉस यांच्यासह आमदार प्रवीण दटके महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी कंपनीसोबत करार करण्यात आला.

नागपूर शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला एकही रुपया खर्च येणार नाही. नेदरलँड येथील एसयूएसबीडीई कंपनी स्वतःच हा प्रकल्प स्वखर्चाने उभा करेल व त्यांचे संचालन करेल. त्याची देखभाल दुरुस्तीही कंपनी करणार आहे. कालबद्ध मर्यादेत हा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले व एका वर्षात प्रकल्प सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रकल्पात जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यातून अक्षय ऊर्जा निर्मिती, बायो सीएनजी, बायोगॅस, खते आणि पुनर्वापर करता येणारी उत्पादने तयार केली जाणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos