तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी बेतकाठी येथे नशामुक्ती अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी, नैतिक मूल्ये आणि संस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने धनंजय स्मृती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, बेतकाठी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियान राबविण्यात आले.
या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांना व्यसनांचे शरीर, मन आणि समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी. एन. लांजेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. कापगते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एच. एच. बिसेन उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत चांगल्या विचारांची आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीची प्रेरणा दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविरोधात जनजागृती निर्माण झाली असून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा अभियानांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




Petrol Price




