अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेचे तीन वर्षे लैंगिक शोषण : चंद्रपुरातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिचे तब्बल तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गेट परिसरातील एका वॉर्डात उघडकीस आली आहे. तीन आरोपींनी संगनमत करून पीडितेला बदनामीची तसेच तिच्या चार वर्षांच्या मुलाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. अखेर मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने पतीसह शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडिता पती आणि चार वर्षांच्या मुलासह चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गेट परिसरातील एका वॉर्डात वास्तव्यास आहे. २०२३ मध्ये शेजारी राहणाऱ्या विक्की ऊर्फ योगेश महादेव अहिलापुरवार २६ वर्ष याने महिलेच्या पतीच्या अनुपस्थितीत सेल्फी काढण्याच्या बहाण्याने तिचे फोटो घेतले. त्यानंतर फोटो डिलीट करण्याच्या बहाण्याने तिला प्रियदर्शिनी चौकात बोलावून घोडपेठ परिसरातील एका ठिकाणी नेले. तेथे फोटो व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. याच घटनेचा व्हिडिओही आरोपीने गुपचूप चित्रित केला.
या व्हिडिओच्या आधारे आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत घोडपेठ तसेच दाताळा मार्गावरील लॉजमध्ये नेऊन तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यानंतर आरोपीने आपला मित्र चेतन नवघरे २६ वर्ष यालाही या प्रकारात सहभागी करून घेतले. २०२४ मध्ये चेतननेही बदनामीची भीती दाखवून बंगाली कॅम्प चौकातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. २०२५ मध्ये अमोल लांजेकर याने पीडितेशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधून आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगितले. तिघांनी संगनमत करून पीडितेच्या चार वर्षांच्या मुलाला नुकसान पोहोचविण्याची धमकी दिली. या धमकीचा धाक दाखवून अमोलनेही घोडपेठ आणि बंगाली कॅम्प परिसरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. सप्टेंबर २०२६ मध्येही व्हिडिओ डिलीट करण्याच्या बहाण्याने महिलेला बोलावून तिचा छळ केला.
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या मानसिक आणि शारीरिक छळाला अखेर पीडितेने वाचा फोडली. पतीला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी दोघांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खंडाईत यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.




Petrol Price




