महत्वाच्या बातम्या

 उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.

खबरदारी म्हणून नागरिकांनी तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सछिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बणविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादीचा वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करित असतांना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावे. जागोजागी पानपोईची सुविधा करण्यात यावी.

लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेले व पार्क केलेले वाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३.३० याकालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos