कंत्राटदाराच्या चुकीमुळेच बंद पडलाय बल्लारपूर - आष्टी मार्ग


- पाईप न टाकताच बनविला रपटा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
मागील ३ दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. आज २९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास बल्लारपूर - आष्टी मार्गावरील दहेली जवळरील नाल्यावर बनविलेला रपटा वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे. मात्र याला कंत्राटदारच कारणीभूत असून पर्यायी रपटा बनविताना त्या ठिकाणी पाईपच टाकण्यात आले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
अहेरी - चंद्रपूर - नागपूर हा महत्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून जडवाहतूक, महामंडळाच्या बसेस, खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. बल्लारपूर - आष्टी या महामार्गाचे काम एका कंत्राटदारामार्फत सुरू आहे. दहेलीजवळील नाल्यावर नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी पर्यायी रपटा तयार करण्यात आला होता. या रपट्याचा वापर करून वाहने काढली जात होती. मात्र या रपट्याला पाईपच टाकण्यात आले नव्हते. यामुळे पाण्याच्या दाबामुळे रपटा वाहून गेला आणि मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प पडली आहे. रापमंच्या बसेसच बल्लारपूर स्थानकात अडकून पडल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-29


Related Photos