महत्वाच्या बातम्या

 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी नवे मानदंड


- १५ सप्टेंबरपर्यंत पूर्तता करणे बंधनकारक

- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवा केंद्रांना पुरस्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सेवा केंद्रांच्या पायाभूत, तांत्रिक सुविधा, नामकरण व मानांकनाबाबत नवीन निकष निश्चित केले आहेत. या निकषांची पूर्तता करण्यासाठी सेवा केंद्रांना १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी निर्धारित निकषांची काटेकोरपणे पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सेवा केंद्रांना आता आपले सरकार-सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार ग्राम पंचायत सेवा केंद्र आणि आपले सरकार-नागरी सेवा केंद्र असे प्रमाणित नामकरण करण्यात आले आहे. सेवा केंद्रासाठी किमान १०० चौरस फुट क्षेत्रफळाची पक्की इमारत, अखंडित वीजपुरवठा, संगणक अथवा लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेब कॅमेरा आणि विश्वासार्ह इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात किमान १० एमबीपीएस, तर नागरी भागात २० एमबीपीएस इंटरनेट वेग आवश्यक राहणार आहे. यासोबतच नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, पुरेशी प्रकाश व्यवस्था तसेच दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नागरिकांकडून वारंवार वापरल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दर्शविणारे फलक तसेच इतर सेवांसाठी QR कोड केंद्रावर प्रदर्शित करावा लागणार आहे.

प्रत्येक सेवा केंद्राचे GIS मॅपिंग करून ५० मीटर परिसरात जिओ-फेन्सिंग करण्यात येणार असून, निर्धारित क्षेत्राबाहेरून लॉगिन करण्यास प्रतिबंध राहणार आहे. सेवा केंद्रांची किमान सहा महिन्यांतून एकदा तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सेवा केंद्रांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांकडून प्राप्त होणारा अभिप्राय केंद्रांच्या मानांकनासाठी विचारात घेतला जाणार असून, सातत्याने नकारात्मक अभिप्राय आढळल्यास सुधारात्मक तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवा केंद्रांना जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर रोख पुरस्कार आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्ह्यातील सेवा केंद्रचालकांनी १५ सप्टेंबरपर्यंत नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक पायाभूत व तांत्रिक सुविधांची पूर्तता करावी. या सुविधांची प्रत्यक्ष पूर्तता झाली आहे किंवा नाही, याची पाहणी जिल्हाधिकारी स्वतः केंद्रांना भेट देऊन करणार आहेत. त्यामुळे सर्व सेवा केंद्रचालकांनी निर्धारित निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.





  Print






Related Photos