महत्वाच्या बातम्या

 दहशतवाद्यांचा गोळीबार : ४ जणांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजौरी पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्पर डांगरीमध्ये काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी हिंदू समुदायाच्या घरावर गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दहशतवाद्यांनी गोळीबार केलेल्या तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. तर, एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तसेच, शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूत नेण्यात आले आहे.

जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी या गोळीबाराविषयी माहिती दिले. दोन दहशतवाद्यांनी अप्पर डांगरी भागातील काही घरांना लक्ष्य केले. पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी अप्पर डांगरी परिसराला घेरले असून, दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच दहशतवाद्यांना पकडून कारवाई करु असे, मुकेश सिंह यांनी म्हटले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर डांगरी परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी एसयूव्ही कारमधून आले होते. त्यांनी राम मंदिराजवळ राहत असलेल्या हिंदू समुदायाच्या तीन घरांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबाळानंतर पोलीस, सीआरपीएफ, लष्कराचे जवान आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  Print


News - Rajy
Related Photos