गिलगाव रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार ?


- कुनघाडा रै. फाटा ते गिलगाव जमी मार्गाची दुरवस्था; विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी आणि वाहनधारक त्रस्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील कुनघाडा रै. फाटा ते गिलगाव जमी या महत्त्वाच्या डांबरी रस्त्याची गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावरील डांबर आणि गिट्टी उखडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे व खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? अशी परिस्थिती -
चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरून पूर्वेकडे सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुनघाडा रै. फाट्यापासून गिलगाव जमीकडे जाणाऱ्या या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून गेल्याने अनेक ठिकाणी केवळ माती व गिट्टीचा थर उरला आहे. त्यातच पावसामुळे खड्ड्यांमध्ये चिखल व पाणी साचत असल्याने रस्त्याची दुरवस्था आणखी वाढली आहे.
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः सावधपणे वाहन चालवावे लागत असून, अचानक खड्डा आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
शासकीय कार्यालये आणि आरोग्य केंद्रामुळे वाहतूक वाढली -
या रस्त्याच्या मध्यभागी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, वनपरिक्षेत्र कार्यालय आणि महसूल मंडळ कार्यालय अशी विविध महत्त्वाची शासकीय ठिकाणे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते.
प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना या खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही खड्ड्यांमधून मार्ग काढताना अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय व महसूल मंडळ कार्यालयातील कर्मचारी तसेच विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था केवळ वाहनधारकांपुरती मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.
कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी -
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. केवळ खड्ड्यांमध्ये मुरूम किंवा गिट्टी टाकून तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी रस्त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराने या समस्येचे गांभीर्य ओळखून कुनघाडा रै. फाटा ते गिलगाव जमी या रस्त्याची तातडीने पाहणी करावी आणि संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
खड्डे बुजवणार तरी कधी? हा नागरिकांचा सवाल -
गेल्या काही काळापासून रस्त्याची अवस्था खराब असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक वाढली असून, भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




