बोटेझरी उपकेंद्रातील कुपोषित बालके उपचाराविना


- मानसेवी डॉक्टर म्हणतात बोटेझरी उपकेंद्रात कुपोषित बालक नाही !
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : 
तालुका मुख्यालयापासून अंदाजे ५० किलोमीटरच्या जवळपास अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल अंतर्गत बोटेझरी  उपकेंद्रातील बोटेझरी, बोटेझरी टोला या गावात भेट दिली असता अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.   गावात नागरिकांशी चर्चा करून अंगणवाडी येथे विचारणा केली असता तेथे एकूण मुलांची संख्या ३६ सांगण्यात आली.  त्यापैकी साधारण मुले १८ मध्यम कुपोषित १३ आणि अतिकुपोषित ५  मुलं असल्याची माहिती मिळाली. मात्र ही बालके उपचाराविना असून  मानसेवी डॉक्टर  बोटेझरी उपकेंद्रात कुपोषित बालकच नसल्याची माहिती देत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. 
 बोटेझरी या गावाची लोकसंख्या २१८ असून ३६ कुटुंबसंख्या असलेले हे गाव आहे. या गावात सहा महिने ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडे दिले जाते.   डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर तसेच स्तनदा मातांना महिन्यातून पंचवीस दिवस रविवार सोडून एक वेळचं जेवण देण्यात येत आहे. ज्यामध्ये पोळी, भात, वरण, भाजी तसेच गूळ व शेंगदाण्याचे लाडू लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. परंतु मागील दोन महिन्यापासून जास्त कालावधी लोटला असून बोटेझरी या गावात डॉक्टर किंवा नर्स हे भरकटले सुद्धा नाही अशी माहिती मिळाली आहे. 
 एकात्मिक बाल विकास विभागाकडून मिळालेल्या जुलै पर्यंतच्या माहितीमध्ये कोरची तालुक्यात  कोरची, कोटगुल, बेतकाठी आणि मसेली हे ४  बीट आहेत.   त्यापैकी कोटगुल क्षेत्रात २३ मुख्य अंगणवाडी असून १८ मिनी अंगणवाड्या आहेत.   यामध्ये मध्यम तीव्र कुपोषित चे एकूण ४२ बालके असून अति तीव्र कुपोषित चे १२ बालके आहेत. बोटेझरी उपकेन्द्राच्या बालकांना खाऊ तर मिळत आहे.  परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांना औषधसाठा वेळेवर मिळत नाही.   पंधरा दिवस किंवा किमान तीस दिवसात तरी एकदा या बालकांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे.  परंतु दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असून ही तपासणी फक्त कागदापुरतीच  असल्याचे सांगण्यात आले. या तपासणीमध्ये उंची मोजणे वजन मोजणी औषधी इत्यादी तपासणी केली जाते. 
 कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील बोटेझरी उपकेंद्रात एकूण सहा गावे आहेत.  बोटेझरी, बोटेझरी टोला, नारकसा, रानकट्टा, टेकामेटा आणि मर्दिनटोला या गावांचा समावेश असून  या  गावात एकूण ९५ लाभार्थी आहेत . ज्यापैकी ६२ साधारण, २०  मध्यम कुपोषित, ९ तीव्र कुपोषित, ३ मध्यम तीव्र कुपोषित व १ अति तीव्र कुपोषित अशी बालके आहेत.  परंतु या उपकेंद्राचे मानसेवी डॉक्टर मोहनिष गहाणे यांनी सांगितले की या उपकेंद्रात एकही कुपोषित बालक नाही.  तर मग खरंच या कुपोषित बालकांची तपासणी होत आहे का? असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या उपकेंद्रात दीड महिन्यापूर्वी एका आरोग्य सेवकाची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. 
 कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वासनिक हे महिन्यातून सहा ते सात दिवस कोटगुल येथे हजर असतात अशी माहिती मिळाली. कुपोषण हा गंभीर मुद्दा असून प्रशासनाकडून खर्च करण्यात येत असलेला करोडो रुपयांचा निधी जर गरजू रुग्णांना वेळेवर मिळत नसेल तर मग कोरची तालुका कुपोषण मुक्त च्या वाटचालीस अग्रेसर होत आहे का? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-29


Related Photos