महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई : अवैध दारूसह ५ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी २४ मे रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास कोठारी–कवडजई मार्गावरील मानोरा गावाजवळील मोहानिया पुल परिसरात धडक कारवाई करून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत देशी व विदेशी मद्यासह वाहन आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार कोठारी–कवडजई रोडवरून एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार  मानोरा गावाजवळील मोहानिया पुल परिसरात नाकाबंदी केली. सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान संशयित वाहन येताच पोलिसांनी ते अडवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान टाटा झेस्ट क्रं एमएच-३४ एव्ही-९६६१ या कारमधून रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या १,८०० सिलबंद बाटल्या तसेच रॉयल स्टॅग विदेशी मद्याच्या ३० बाटल्या आढळून आल्या. जप्त मद्याची किंमत सुमारे ७९ हजार ५०० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार आणि मोबाईलसह एकूण ५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सुमित निळकंठ ठेंगणे (वय २६) व रितेश रमेश अनमुलवार (वय २३) दोन्ही रा. कोठारी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी हा मद्यसाठा छोटू भैय्या उर्फ करीम उस्मान शेख, रा. बल्लारपूर याच्या सांगण्यावरून पुरवठा करण्यासाठी नेत असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा प्रविण निकोडे, मोहनलाल निषाद व सहकाऱ्यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos