आधार क्रमांक टाकून कर विवरण पत्र भरल्यास मिळणार पॅन क्रमांक


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : कुठल्याही करदात्याने आधार क्रमांक टाकून कर विवरण पत्र भरल्यास त्याला आपोआप कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन क्रमांक देण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याने  १ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.  या सुविधेमुळे  पॅन क्रमांकासाठी आता वेगळे काम करण्याची गरज नाही.  
पॅन व आधार या  दोन माहिती संचांची जोडणी केली असल्याने जेव्हा एखादी व्यक्ती आधार क्रमांक टाकून विवरण पत्र भरेल तेव्हा आपोआप आधारमधील माहिती घेऊन त्या  व्यक्तीचा पॅन क्रमांक तयार होईल. याबाबतची अधिसूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ३० ऑगस्ट रोजी जारी केली आहे.
पॅन क्रमांकासाठी कुठलीही वेगळी कागदपत्रे करदात्याला सादर करावी लागणार नाहीत. हा नियम १ सप्टेंबरपासून अमलात आला आहे.  कर विभागाने आधार म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया कडून प्रत्येक व्यक्तीची सगळी माहिती घेतली असून त्याआधारे पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पी.सी मोदी यांनी सांगितले की, आधार क्रमांक देऊन कर विवरण पत्रे भरणाऱ्या सर्वच व्यक्तींना त्यांच्याकडे पॅन नसल्यास तो आपोआप मिळणार आहे. कर निर्धारण अधिकारी हे स्वत:हून पॅन क्रमांक जारी करू शकतात असा कायदा आहे, त्यामुळे त्याचा वापर करून ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही पण ते विवरणपत्र आधार क्रमांकाने  भरू इच्छितात त्यांना आपोआप पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे. आधार व पॅन यांचा माहिती संच एकमेकांना जोडणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या भारतात १२० कोटी आधार क्रमांक देण्यात आले आहेत, तर एकूण ४१ कोटी पॅन क्रमांक जारी केले आहेत.   Print


News - World | Posted : 2019-09-03


Related Photos