'व्हिआयपी गाढव' संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई :
  ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके पॅटर्न असणारा कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित, संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ येत्या १३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न झाला. चित्रपटात भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विजय पाटकर, शीतल अहिराव, पूजा कासेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सिनेमाला अशोक वायंगणकर आणि रवी वाव्होळ यांचे संगीत लाभले असून गाणी त्यागराज खाडीलकर, कविता राम, ओंकार महाडिक यांनी गायली आहेत. यावेळी भाऊ कदम म्हणाले कि, मी ह्या चित्रपटात गंगारामचं पात्र साकारले आहे. जेव्हा संजय सरांकडून चित्रपटाचं कथानक मी ऐकलं तेव्हाच मला कथा खूप आवडली होती आणि त्यांना मी तेव्हाच म्हणालो कि हा तर  माझाच बाज आहे आणि मी उत्तमरित्या तुम्हांला हे पात्र करून दाखवेल. मी खूप जीव ओतून ह्या चित्रपटात काम केलंय आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल असं मला वाटतं, छोट्या पडद्यावर माझ्या कामाचे जसे कौतुक करतात तसंच सिनेमातील माझे हे काम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
शिवाय सिनेमात गाढवाची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे, संपूर्ण गोष्टच गाढवाभोवती गुंफल्याने हा व्हिआयपी गाढव ठरला आहे.
चित्रपटाचे दिगदर्शक संजय पाटील चित्रपटाबद्दल सांगतात कि, व्हिआयपी गाढव हा सिनेमा खऱ्या अर्थाने दादा कोंडके पॅटर्न सिनेमा आहे. म्हणजे तुम्हाला यात ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके पॅटर्न या तिघांचा मेळ सापडेल. एका खेडेगावात एक कुटुंब आहे, ज्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या गाढवावर असतो, अचानक अशी काहीतरी घटना घडते ज्यामुळे त्या कुटुंबाचे जीवनच पालटून जाते, ते नेमकं काय आहे? यासाठी सिनेमा बघावा लागेल. 
सिनेमाचे शीर्षक आणि गोष्ट कशी सुचली याचा मजेशीर किस्सा ते सांगतात, निर्माते डॉ. रणजीत सत्रे काही दिवसांपूर्वी आझाद मैदानात अन्य डॉक्टरांसोबत आंदोलनात उपोषणाला बसलेले होते आणि प्रशासनाबरोबर त्यांची  चर्चा सुरू होती, डॉक्टरांच्या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा डॉ.सत्रे बाकीच्या बड्या डॉक्टरांना म्हणाले कि सगळं काही प्रशासनाच्या हातात आहे असं काही नाही कि ते करू शकत नाहीत एका गाढवाला हि ते व्हिआयपी करू शकतात आणि या ओळीवरूनच त्यांना सिनेमा सुचला. डॉ.सत्रे यांच्या कथेला  डॉ.प्रसन्ना देवचके यांनी फुलवण्यात मोलाची साथ दिली आहे.
सिनेमात भारत गणेशपुरे एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत असून सोबतीला विजय पाटकारांचा विनोद देखील मनमुराद हसवणारा आहे.चित्रपटात चार गाणी असून सगळी गाणी वेगळ्या धाटणीची आहे.सिनेमाची भाषा, लोकेशन आणि गाणी हे सर्व काही पाहून प्रेक्षकांना पुन्हा एकदा दादा कोंडके यांची आठवण होणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-19


Related Photos