महत्वाच्या बातम्या

 रेल्वे पूल अपघाताची सखोल चौकशी करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत द्या : आमदार विजय वडेट्टीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काल सायंकाळच्या सुमारास पादचारी पुलात अपघात होऊन यात एकाचा नाहक बळी गेला तर अनेक जण जखमी झाले. सदर अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी. तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये अर्थिक मदत व कुटुंबातील सदस्यांना रेल्वे प्रशासनात नोकरी आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षतीग्रस्त पुलाची पाहणी करताना केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक बल्लारपूर येथे आहे. अशातच लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा असल्याने येथे प्रचंड प्रवास्यांची वर्दळ असते. अशातच काल सायंकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळल्याने या अपघातात दोन जण गंभीर जखमी व इतर १३ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. तर उपचारादरम्यान एका शिक्षिकेला प्राणही गमवावे लागले. गेल्या वर्षानुवर्षांपासून सदर पादचारी पुलाचा वापर होत असताना रेल्वे प्रशासनाने  पादचारी  पुलाचे मजबुतीकरण व देखभाल दुरुस्ती कामाचे ऑडिट केले काय? असा प्रश्न उपस्थित करीत माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले. तसेच बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या डी. आर. एम. रीचा खरे यांच्याशी पूल अपघाता बाबत चर्चा करून सदर पादचारी पूल अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत अपघातात मृत पावलेल्या शिक्षिका रंगारी यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वे प्रशासनात नोकरी देण्याची व इतर जखमींना देखील आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. रजनी हजारे, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, बल्लारपूर काँग्रेसचे घनश्याम मुलचांदाणी,  शहराध्यक्ष करीम शेख, भास्कर माकोडे, मेघा भाले, कासिम शेख, रेखा रामटेके व बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत रोष व्यक्त करीत घोषणाही देण्यात आले.





Facebook    Twitter      
  Print






News - Chandrapur | Posted : 2022-11-28




Related Photos