महत्वाच्या बातम्या

 निष्काळजी व चुकीच्या उपचारांमुळे महिलेचा मृत्यू : डॉक्टर दाम्पत्याला ४० लाखाचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लातूर  : लातूरमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत तक्रार आल्यानंतर ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अकरा महिने २८ दिवसात निकाल देत डॉक्टर दाम्पत्याला तब्बल ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लातूर जिल्ह्यातील नणंद या गावातील रेवती गावकरे ही २७ वर्षीय महिला मागील वर्षी घरकाम करताना पडली होती. त्यांच्या हाडाला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना लातूर इथल्या डॉ. विक्रम सूर्यवंशी आणि डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या शुद्धीवरच आल्या नाहीत. यानंतर डॉक्टर दाम्पत्याने रुग्णाच्या नातेवाईकांना याबाबत माहिती न देता परस्पर दुसऱ्या रुग्णालयात हलवले. तिथे तपासणी झाल्यानंतर रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.

मृत रेवती गावकरे यांना दोन लहान मुले आहेत. किल्लारी येथील खाजगी दुकानावर त्या काम करत नऊ हजार रुपये महिना कमवत होत्या. वडिलांकडे दोन्ही लहान मुलांना घेऊन त्या राहत होत्या. अचानकपणे मुलगी दगावली आणि दोन नातू सांभाळण्याची जबाबदारी आजोबा मोहन पाटील यांच्यावर आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रेवती गावकरे यांचा मृत्यू झाला असा आरोप वडिलांनी केला. अखेर डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात रुग्ण हक्क समितीच्या सहकार्याने त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगात डॉक्टर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणावर कारवाई करत ग्राहक मंचाने ११ महिने २८ दिवसात निर्णय दिला. निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे रेवती गावकरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युसाठी जबाबदार असणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला दोन मुलांच्या उदरनिर्वाहासाठी ४० लाख रुपये द्यावेत, असा निर्णय ग्राहक मंचाने दिले.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होतो, अशी ओरड सातत्याने होत असते. मात्र रुग्णांचे नातेवाईक कायदेशीर लढाईच्या प्रक्रियेला सामोरे जात नाहीत. यामुळे दोषी डॉक्टरांना भीती वाटत नाही. मात्र या निकालानंतर चित्र बदलेल असा विश्वास रुग्ण हक्क समिती सदस्यांना वाटत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos