महत्वाच्या बातम्या

 २५ टक्के बालकांमध्ये जन्मजात व्यंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जन्मजात व्यंग टाळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान व अपवादात्मक परिस्थितीत २४ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला गर्भ पाडण्याला कायद्याची मंजुरी आहे, असे असतानाही एकट्या मेडिकलमध्ये १२०० बालकांमधून ३०० म्हणजे २५ टक्के बालकांमध्ये जन्मजात व्यंग दिसून येते. यात डाऊन सिंड्रोम म्हणजे शारीरिक तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.

जन्मदोष म्हणजे, जन्मापासूनच बालकांमध्ये आढळणारे रचनात्मक किंवा कार्यात्मक दोष. जागकित आरोग्य संघटनेनुसार जगभरात जवळपास ६ टक्के बालकांना जन्मत:च दोष किंवा व्यंग असते. यापैकी ९४ टक्के घटना या विकसनशील देशांमध्ये घडतात. भारतात जन्मत: व्यंगामुळे सुमारे ७ टक्के बालकांचा मृत्यू होतो. यामुळे जन्मदोषाची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओठ फाटलेले, हातपाय वाकडे व हृदयविकार

मेडिकलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सायरा मर्चंट यांच्यानुसार, जन्मत: व्यंग असलेल्या बालकांमध्ये ओठ फाटलेले, हातपाय वाकडे असलेले, हृद्यविकार, एकापेक्षा जास्त बोटे असणे याशिवाय बालकांमध्ये गुणसूत्रातील असमानता, चयापचय क्रियेतील दोष, थैलेसेमिया, सिकलसेल, अनिमिया, रक्ताशी निगडित आजार, मज्जासंस्थेसंबंधी दोष आढळून येतात. सरसकट जन्माला येणाऱ्या हजार बाळांमध्ये जवळपास २५ बाळांमध्ये जन्मजात व्यंग आढळून येते.

रक्ताची मोफत तपासणी

शासकीय रुग्णालयात मोफत रक्त तपासणीतून बालकाच्या जन्मजात व्यंगाचे निदान केले जाते. नवजात तपासणी योजनेच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते. मेडिकलमध्ये ही तपासणी केल्यावर जवळपास २५ टक्के बालकांमध्ये व्यंग आढळून आले.

कधी केली जाते तपासणी

शासकीय रुग्णालयात जन्मापासून २४ तास ते ४८ तासांच्या आत बालकांचे रक्त तपासणीसाठी घेतले जाते. तसेच मुदतपूर्व प्रसूती, कमी वजन, जन्मला आल्यानंतर बाळ न रडणे, नवजात शिशु कक्षातील बाळांचे रक्त घेऊनही व्यंगाची तपासणी केली जाते.

बाळाच्या टाचेतून रक्त

जन्मजात व्यंग निदानासाठी बाळाच्या टाचेतून रक्त घेतले जाते. रक्ताचा नमुना तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविला जातो.

सोनोग्राफीसंदर्भात जनजागृती वाढविणे गरजेचे

जन्मजात व्यंग असलेली बालके जन्माला येणे टाळण्यासाठी सोनोग्राफीसंदर्भात गरोदर स्त्रियांमध्ये जनजागृती वाढविणे गरजेचे आहे. करिअर आणि इतर कारणांमुळे होत असलेले उशीरा लग्न व मूल यामुळेही जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. या बालकांमध्ये डाऊन सिंड्रोम सर्वाधिक दिसून येतो.






  Print






News - Nagpur




Related Photos