विदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती : 
विदर्भ म्हंटल म्हणजे, उकाडा, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न हेच डोळ्यासमोर येतं. पण या व्यतिरिक्त विदर्भाच्या मातीत देखील कलाक्षेत्रात काम करणारे हरहुन्नरी कलावंत आहेत. अशाच विदर्भात म्हणजेच अमरावतीमधून एक मराठी सिनेमा साकारला जातोय. सुलतान शंभू सुभेदार असं त्याचं नाव आहे. नाव वाचून  तुम्ही चकित झाला असाल, पण हे आहे यश असोसिएट मुव्हीज निर्मिती संस्थेअंतर्गत कैलास गिरोळकर व अॅड. प्रशांत भेलांडे निर्मित, आणि डॉ. राज माने दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपटाचे. नावातच हिंदू-मुस्लीम नावाचा अनोखा मिलाफ दिसून येतो तसाच हा सिनेमा हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल भाष्य करतो.
यश गिरोळकर, दिगंबर नाईक, किशोर महाबोले, देवेंद्र दोडके, जयवंत भालेकर, अॅड.प्रशांत भेलांडे, उज्वला गाडे, सिमरन कपूर, सुप्रिया बर्वे, ज्योति निसळ, चारू देसले यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. गीतकार अॅड. प्रशांत भेलांडे यांच्या गाण्यांना धनश्री देशपांडे, डॉ. डहाणे, श्रीरंग भाले यांनी स्वरबद्ध केली असून अरविंद हसबनीस यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमात अनेक विदर्भाच्या कलावंताना संधी देण्यात आली आहे. 
दिग्दर्शक डॉ. राज माने सांगतात की, “सुलतान शंभू सुभेदार” या सिनेमाचे कथानक एका सत्य घटनेवर बेतलेले आहे. त्याला कल्पनेची जोड देत अॅड.प्रशांत भेलांडे यांनी कथा गुंफली आहे. ही कथा आहे एका मुस्लीम कुटुंबातील हरवलेल्या सुलतानची. ज्याचे पालन पोषण एक हिंदू रिक्षाचालक शंभू सुभेदार करतो. आयुष्याच्या एका वळणावर या दोघांची भेट होते आणि तिथूनच शंभूचे विश्व बदलून जाते. दोघांच्या नात्यात जिव्हाळा आणि प्रेम झाल्याने दोघे आनंदाने जगत असतात. आता शंभूच्या आयुष्यात सुलतानशिवाय दुसरं कुणीही नाही. त्याला लहानाचे मोठे करण्यात, शिकवण्यात शंभू आपले सर्व जीवन घालवतो. परंतु एक क्षण असा येतो कि तिथे सुलतानचे जन्मदाते उभे ठाकतात...पुढे सुलतानचे काय होते? तो जन्मदात्या अम्मी – अब्बू कडे जातो की शंभूकडे राहतो हे पाहण्यासाठी सिनेमा बघावा लागेल.
दिग्दर्शक पुढे सांगतात की, अमरावतीचे निर्माते कैलास गिरोळकर यांनी अशा विषयाचा सिनेमा करण्याचे धाडस केले यासाठी मी त्यांचा आभारी आहे, कारण गल्लाभरू आणि आचरट विनोदी सिनेमा करण्याला त्यांनी बगल देत, सामाजिक बांधिलकी जपत असा एक संवेदनशील विषय हाताळणे खरोखर धाडसाचे काम आहे. सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-26


Related Photos