देसाईगंज शहरात वेडसर महिलेने दिला बाळाला जन्म


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  देसाईगंज :
शहरातील भूमिगत पुलाच्या शेजारी रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका वेडसर महिलेने निरागस बालकाला जन्म दिला. प्रसुतीच्या वेदनेने विव्हळत असलेल्या या महिलेवर शहरातील डॉक्टर चंद्रकांत नाकाडे यांनी तत्परतेने उपचार करून तिची प्रसुती केली. नवजात बालक व महिलेची प्रकृती ठिक असून पुढील उपचारासाठी या दोघांना देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या भूमिगत पुलाच्या खाली एक वेडसर महिला वेदनेने विव्हळत असल्याचे दिसून आली. दरम्यान ज्ञानेश्वर पगाडे यांनी प्रसुतीच्या वेदना असल्याचे समजताच त्यांनी डॉ. चंद्रकांत नाकाडे यांना भ्रमणध्वनीद्वारे संदेश पोहोचविला. लागलीच डॉ. नाकाडे यांनी प्रसुतीसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण औषध व इतर साहित्यासह घटनास्थळ गाठले. भूमिगत पुलाच्या फुटपाथवर प्रसुतीच्या वेदनेने तडफडत असलेली महिला तशीच होती व नवजात बालकाचे डोके बाहेर आले होते तसेच रक्तस्त्राव सुरू होता. यावेळी नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. काही नागरिकांनी सदर महिलेच्या मदतीसाठी प्रयत्न करीत होते. अशा परिस्थितीत डॉ. चंद्रकांत नाकाडे यांनी सदर महिलेची प्रसुती करून महिला व तिच्या नवजात बालकाला नवसंजीवनी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या आनंदसिंह चावला यांनी आपल्या चारचाकी वाहनातून सदर महिला व बालकाला देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. नवजात बालक हे सुदृढ असून त्याचे वजन ३.५० किलो ग्रॅम आहे.
गर्भवती असलेली ही महिला गेल्या एक महिन्यापासून देसाईगंज शहरात फिरताना दिसून येत होती. अस्खलित इंग्रजीमध्ये संभाषण करणारी ही महिला हिंदी भाषीक आहे. तिला इंग्रजी व हिंदी भाषेत बडबड करताना अनेकांनी पाहिले. कुठेही इतरत्र भटकत असलेल्या लोकांना रेल्वेगाडीत बसविले जाते. अशा प्रसंगातूनच सदर वेडसर महिला देसाईगंज शहरात महिनाभरापूर्वी आल्याचे समजते. वेदनेच्या कळेने विव्हळत असलेल्या महिलेला मदत करून नवसंजीवनी देणाऱ्या डॉ. नाकाडे व चावला कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  आता या वेडसर महिलेच्या मुलाचे संगोपण कोण करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. बालकाच्या संगोपनासाठी एखादी सामाजिक संस्था पुढे येण्याची गरज आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-05


Related Photos