महत्वाच्या बातम्या

 प्रस्तावित वैनगंगा टेंट सिटी महोत्सवाच्या नियोजनाला वेग विविध विभागांचा आढावा : पर्यटकांच्या सुविधा व सुरक्षिततेवर भर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित वैनगंगा टेंट सिटी महोत्सव डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मौदी रावणवाडी येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाच्या आयोजनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच महोत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यावर भर देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. महोत्सवाच्या विविध उपक्रमांसाठी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सी.एस.आर. (Corporate Social Responsibility) निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पर्यटकांच्या वास्तव्यासाठी सुसज्ज टेंट सिटी उभारण्यात येणार असून, त्याठिकाणी पाणीपुरवठा, वीज, स्वच्छतागृहे,  आदी मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे. पर्यटकांना सोयीस्कर व आनंददायी अनुभव मिळावा, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.

महोत्सवस्थळी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था व वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दल, प्रथमोपचार केंद्र आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्कालीन व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

वैनगंगा टेंट सिटी महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे आणि स्थानिक संस्कृतीला व्यापक प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच स्थानिक व्यावसायिक, कलाकार आणि नागरिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे.





  Print






Related Photos