जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला : पाठीवर चाकू खुपसून गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मुलीशी बोलण्याच्या जुन्या वादातून तरुणाचा रस्ता अडवून त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी बल्लारपूर शहरात शांती नगर, ग्रामीण रुग्णालयाच्या मागे घडली. रोशन भोंड याच्या पाठीवर, बगलेच्या बाजूने चाकूचा वार करण्यात आला. चाकू शरीरातच घुसून राहिल्याने रोशन गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला बांबूच्या काठीनेही मारहाण करण्यात आली.
रोशन भोंड हा रेल्वे स्टेशन परिसरात पाण्याच्या बाटल्या विक्रीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी एका मुलीशी बोलण्याच्या कारणावरून त्याचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. याच वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
रविवारी दुपारी सुमारे एक वाजता रोशन मोटारसायकलवरून जात असताना साजन खच्ची याने त्याचा रस्ता अडविला. त्यानंतर बब्बीर खच्ची आणि दोन अल्पवयीन आरोपी तेथे आले. बब्बीरने रोशनचे दोन्ही हात पकडले. त्यावेळी एका आरोपीने रोशनच्या पाठीवर, बगलेच्या बाजूने चाकूने वार केला. चाकू शरीरात घुसून राहिल्याने रोशन गंभीर जखमी झाला. त्यानंतर अन्य आरोपीने बांबूच्या काठीने त्याला मारहाण केली.
हल्ल्यात जखमी झालेला रोशन मोटारसायकलसह खाली पडला. त्याने स्वतःला सावरत मदतीसाठी परिसरात धाव घेतली. मला चाकूने मारले असा आरडाओरडा केल्यानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, मदन दिवटे आणि पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींना घटनास्थळापासून दूर जाण्यापूर्वीच पकडण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी जखमी रोशनला तातडीने बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रोशनची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बब्बीर खच्ची याच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून साजन खच्ची हा फरार आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव चव्हाण करीत आहेत. किरकोळ वादातून थेट जीवघेण्या चाकूहल्ल्यापर्यंत प्रकार पोहोचल्याने या घटनेने बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे.




Petrol Price




