वैनगंगा नदीपात्रात तरुणाने घेतली उडी, पंधरा दिवसांतील दुसरी घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  देसाईगंज : 
 काही दिवसापूर्वी देसाईगंज शहरातील एका तरुणीने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन  आत्महत्या केली होती.  पंधरा दिवसामध्ये त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. काल १५ सप्टेंबर रोजी  दुपारी सुमारे २:३० च्या सुमारास एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेतली. 
 देवेंद्र करसुंगे असे युवकाचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही कामानिमित्त तो  देसाईगंज येथे आला असता कौटुंबिक व आर्थिक गोष्टीला कंटाळून देवेंद्र करसुंगे याने   आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु घटनास्थळावरून जात असलेल्या अमोल पेंदाम व आसिफ शेखानी या दोन तरुणांना  देवेंद्र नदीपात्रात उडी घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच देसाईगंज पोलिसांना घटनेची माहिती दिली व त्या दोन तरुणांनी तात्काळ देवेंद्र ला वाचविण्यासाठी धडपड सुरू केली.  परंतु नदीपात्रात उडी घेणे शक्य नसल्याने त्यांनी देसाईगंज शहरातील हेटी वार्डमधून सरळ नदीपात्र गाठले व इतक्यात देवेंद्र हा पाण्याच्या प्रवाहात वाहून येताना दिसताच  अमोल पेंदाम व आसिफ शेखानी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान पाण्याच्या प्रवाहात उतरून देवेंद्रला ओढत पाण्याच्या बाहेर काढले. इतक्यात देसाईगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले व देवेंद्रला आपल्या ताब्यात घेऊन तात्काळ ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे उपचारार्थ दाखल केले.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देसाईगंज शहरातील रेल्वे भूमिगत पुलाखाली एका वेडसर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला होता त्याघटनेत सुद्धा अमोल पेंदाम या तरुणाने सर्वप्रथम मदतीसाठी धाव घेऊन त्या महिलेला रुग्णालयात पोहोचविण्यात सहकार्य केले होते. अश्या या धाडसी व शौर्य तरुणावर शहरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा जीव वाचला असून आता त्याची प्रकृती बरी आहे.आत्महत्येसाठी उडी घेतलेल्या तरुणाचा जीव वाचविणाऱ्या अमोल पेंदाम व आसिफ शेखानी या दोन तरुणांचा पोलीस स्टेशन देसाईगंज तर्फे सत्कार करण्यात येईल.
प्रदिप लांडे
पो.नि. पोलीस स्टेशन देसाईगंज  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-16


Related Photos