महत्वाच्या बातम्या

 प्रशस्त २.० प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ आता मराठीत उपलब्ध


- दिव्यांग विद्यार्थ्यांची प्राथमिक ओळख व तपासणी करण्यासाठी शिक्षकांना मिळणार अधिक सक्षम साधन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शालेय शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची लवकर ओळख पटवून त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य व इतर पाठबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने विकसित केलेली प्रशस्त २.० (Pre-Assessment Holistic Screening Tool) प्रणाली आता महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओंसह उपलब्ध झाली आहे. मराठी भाषेतील या व्हिडिओंमुळे राज्यातील शिक्षकांना प्रणालीची कार्यपद्धती समजून घेणे आणि तिचा शाळास्तरावर प्रभावी वापर करणे अधिक सुलभ होणार आहे. प्रशस्त २.० हे डिजिटल व्यासपीठ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत समाविष्ट २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांची शाळास्तरावर प्राथमिक तपासणी करण्यासाठी शिक्षकांना सहाय्य करते.

या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या विविध अडचणींची प्राथमिक पातळीवर नोंद घेऊन, आवश्यकतेनुसार पुढील तज्ज्ञ तपासणी व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होते. यापूर्वी प्रशस्त २.० प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध होते. आता प्रादेशिक भाषांमध्येही हे मार्गदर्शक व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यातील मराठी भाषेतील सामग्रीमुळे महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रणाली समजून घेणे आणि तिचा प्रत्यक्ष वापर करणे अधिक सोपे होणार आहे.

सूक्ष्म बदलांवरून दिव्यांगत्वाची प्राथमिक ओळख -
विद्यार्थ्यांमधील सर्व प्रकारचे दिव्यांगत्व बाह्य स्वरूपातून किंवा सहजपणे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल, शिकण्याची पद्धत, शैक्षणिक सहभाग, संवादातील अडचणी तसेच दैनंदिन क्रियांमधील अडथळे यावरून काही समस्या प्राथमिक स्तरावर लक्षात येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन निरीक्षण करणाऱ्या शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रशस्त २.०च्या माध्यमातून शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती पद्धतशीरपणे नोंदविण्यास आणि आवश्यकतेनुसार पुढील तज्ज्ञ तपासणीसाठी संदर्भ देण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रशस्त २.० ही केवळ प्राथमिक तपासणी व संदर्भासाठीची प्रणाली असून, तिच्या माध्यमातून अधिकृत दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय निदान दिले जात नाही. अंतिम वैद्यकीय निदान व दिव्यांगत्वाचे प्रमाणन हे संबंधित अधिकृत वैद्यकीय यंत्रणेमार्फतच केले जाते.

दोन टप्प्यांत होणार प्राथमिक तपासणी -
प्रशस्त २.०मधील तपासणी प्रक्रिया दोन टप्प्यांत विभागण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नियमित शिक्षक विद्यार्थ्यांचे सातत्याने निरीक्षण करून त्यांच्या शैक्षणिक व दैनंदिन वर्तनाशी संबंधित प्राथमिक माहिती संकलित करतात. विद्यार्थ्यांच्या सहभागातील बदल, शिकण्यातील अडचणी किंवा इतर लक्षणीय बाबींची नोंद या प्रक्रियेत केली जाते. दुसऱ्या टप्प्यात विशेष शिक्षक किंवा संबंधित तज्ज्ञांकडून नियमित शिक्षकांनी नोंदविलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. आवश्यकतेनुसार पुढील तपासणी किंवा तज्ज्ञ सेवांसाठी विद्यार्थ्यांना संदर्भित करण्याची कार्यवाही केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य गरज प्राथमिक स्तरावरच लक्षात येऊन त्यांना योग्य वेळी आवश्यक शैक्षणिक व सहाय्यक सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

मराठी मार्गदर्शक व्हिडिओतून प्रणालीची कार्यपद्धती स्पष्ट -
मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओमध्ये प्रशस्त २.० प्रणालीचा वापर करण्याची संपूर्ण प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अ‍ॅपमध्ये लॉगिन करण्याची पद्धत, तपासणी सूचीचा योग्य वापर, विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षितपणे संकलित करण्याची प्रक्रिया, स्वयंचलित अहवाल निर्मिती आणि पुढील तज्ज्ञ तपासणीसाठी योग्य संदर्भ (Referral) देण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली आहे. स्थानिक भाषेतील मार्गदर्शनामुळे शिक्षकांना प्रणालीच्या विविध बाबी अधिक सहजपणे समजून घेता येणार असून, तिचा प्रभावी वापर करण्यास मदत होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात ६३ टक्के शिक्षकांचा सहभाग -
प्रशस्त २.० प्रणालीच्या जनजागृती आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांचा चांगला सहभाग नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १,२८८ शाळांमधील एकूण ६,४०८ शिक्षकांपैकी ४,०९८ शिक्षकांनी, म्हणजेच सुमारे ६३ टक्के शिक्षकांनी, मार्गदर्शक व्हिडिओंच्या माध्यमातून प्रशस्त २.० प्रणालीची संकल्पना, कार्यपद्धती आणि प्राथमिक तपासणीची प्रक्रिया समजून घेतली आहे. उर्वरित मुख्याध्यापक व शिक्षकांनीही मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओंचा उपयोग करून प्रणालीची माहिती करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी तिचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समावेशित शिक्षणाला मिळणार बळ -
दिव्यांग विद्यार्थ्यांची वेळेवर ओळख, योग्य संदर्भ सेवा आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्य उपलब्ध झाल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे शाळास्तरावर शिक्षकांच्या माध्यमातून प्राथमिक निरीक्षण आणि संदर्भ प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी प्रशस्त २.० हे महत्त्वाचे साधन ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक सहभागाचे संवेदनशीलपणे निरीक्षण करून गरज भासल्यास योग्य वेळी तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ उपलब्ध झाल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी प्रशस्त २.० प्रणालीचा वापर अधिक सुलभ, परिणामकारक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होणार आहे.





  Print






Related Photos