महत्वाच्या बातम्या

 अजनी व गोधनी ही दोन रेल्वेची उपस्थानके म्हणून नावारूपाला येतील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत्वाने होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोधनी स्थानकावर केले.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला. या प्रकल्पात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश असून त्यासाठी दीड हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निमित्ताने गोधनी रेल्वे स्थानकावर गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गडकरी म्हणाले, काटोल, नरखेड येथून मोठ्या प्रमाणात लोक नागपूरला येतात. आधुनिकीकरणामुळे या स्थानकांवर जास्तीत जास्त गाड्यांना थांबा मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची विशेष सोय होणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकानंतर आता अजनी आणि गोधनी ही दोन उपस्थानके म्हणून नावारूपाला येतील, असेही ते म्हणाले.

रेल्वे मंत्र्यांना मेट्रोचा प्रस्ताव : 

नागपूर येथून अमरावती, गोंदिया, वर्धा, नरखेड, वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांना दिला आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्थानके विकसित करताना चांगले रस्ते, पार्किंगची व्यवस्था याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कारही यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आला.

ट्रॉली बस चालविणार : 

पुनर्विकासानंतर गोधनी स्थानकाची उपयोगिता वाढविण्यासाठी येथे आउटर रिंग रोडच्या माध्यमातून ट्रॉली बस चालविण्याचा विचारही गडकरींनी बोलून दाखविला. ही बस काटोल आणि एमआयडीसी, हिंगणा येथून चालविली जाईल.





  Print






News - Nagpur




Related Photos