महत्वाच्या बातम्या

 शेतकरी अभ्यास दौऱ्याची आज सोडत : पाच शेतकऱ्यांची विदेश दौऱ्यासाठी होणार निवड


- गतवर्षीच्या निवड प्रक्रियेवरून वाद; यंदा पारदर्शकतेकडे लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया आणि परदेशातील शेती पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या शेतकरी अभ्यास दौरा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची विदेश दौऱ्यासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. गतवर्षी शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कृषी संस्थाचालकांची निवड झाल्याने विदेश अभ्यास दौऱ्याची योजना चांगलीच वादात सापडली होती. त्यामुळे यंदाच्या निवड प्रक्रियेकडे शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

पाच शेतकऱ्यांची विदेश दौऱ्यासाठी निवड -
शेतकऱ्यांना देश-विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग प्रत्यक्ष पाहता यावेत आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीत करता यावा, या उद्देशाने शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. या माध्यमातून निवड झालेल्या शेतकऱ्यांना विदेशातील कृषी पद्धती, पीक उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेचा अभ्यास करण्याची संधी मिळते. यंदा गडचिरोली जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड होणार आहे. यासाठी प्राप्त अर्जांमधून पात्र शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, अंतिम निवड सोडतीद्वारे केली जाणार आहे.

गतवर्षीच्या वादाची पार्श्वभूमी -
गतवर्षी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विदेश अभ्यास दौऱ्याच्या निवड प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कृषी संस्थाचालकांचा समावेश झाल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना डावलून इतरांची निवड झाल्याने योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा पात्र शेतकऱ्यांमधूनच निवड व्हावी आणि प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागाच्या कार्यालयात सोडत -
यंदाच्या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र शेतकऱ्यांची सोडत २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून पाच शेतकऱ्यांची विदेश दौऱ्यासाठी निवड होईल. सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, याकडे कृषी विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सोडतीकडे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos