उष्णतेची लाट कधी, पाऊस कधी : आता एआय सांगणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात उष्णतेची लाट कधी येणार, पाऊस कधी व किती येणार, याबाबतचा अंदाज अधिक अचूकतेने सांगण्यासाठी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व मशिन लर्निंग चा (एमएल) वापर सुरू केला आहे.
हवामानाच्या अंदाजासाठी सध्या संख्यात्मक मॉडेल वापरले जाते. पुढील काही वर्षांत एआय त्यास पूरक ठरेल, असे आयएमडी महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हणाले.
१९०१ पासूनच्या नोंदी झाल्यात डिजिटल -
आयएमडीने १९०१ पासूनच्या देशातील हवामानाच्या नोंदी डिजिटल केल्या आहेत आणि त्याद्वारे विश्लेषण आणि माहिती मिळवत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामानाचा अंदाज वर्तविणे सोपे होऊ शकते. आमचे उद्दिष्ट तालुका किंवा गावपातळीवर अंदाज देणे हे आहे. शेती, आरोग्य, शहरी नियोजन, जलविज्ञान आणि पर्यावरणातील क्षेत्र-विशिष्ट गरजांसाठी हवामान माहिती देणे यांचा त्यात समावेश आहे, असेही महापात्रा यांनी सांगितले.
मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट -
आयएमडीने पुढील काही दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा व आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच देशात निवडणुका असल्याने मतदानावर परिणाम होईल का, याबाबत चिंता व्यक्त जात आहे.
एक देश, एक निवडणूक साठी नियोजन -
सरकार लोकसभा आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कल्पनेवर विचार करत आहे. एवढ्या मोठ्या योजनेचे नियोजन करताना अधिकाऱ्यांनी हवामानाचा अंदाज निश्चितपणे विचारात घेतला पाहिजे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात भारतात तीव्र उष्णता जाणवेल आणि अधिकाऱ्यांना चांगली तयारी करण्यासाठी आयएमडीचा अंदाज सहायक ठरू शकतो, असे महापात्रा यांनी सांगितले.
News - World