मंडपाला आग लागल्याने विटा टाकणारा मजूर जळून खाक : खेडी गावातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिराेली : मंडपाला आग लागल्याने विटा बनविणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खेडी गावातील शेतशिवारात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मनोहर नत्तू आत्राम (६७) रा. कन्हाळगाव) असे मृतकाचे नाव आहे.
रांगीटाेला येथील नाजूकराव ताडाम यांचे खेडी गावाला लागूनच शेत आहे. या शेतात कन्हाळगाव येथील मनोहर नत्तू आत्राम व जयदेव हलामी (६५) हे दाेघे विटा बनविण्याचे काम करीत हाेते. रात्री ते त्याच ठिकाणी मुक्कामी राहत हाेते. या ठिकाणी मंडप उभारण्यात आला हाेता. थंडीच्या कालावधीत ऊब राहावी, म्हणून ते धानाच्या तणशीवर चादर टाकून झाेपत हाेते. थंडी असल्याने मनाेहरने मंडपाजवळ शेकाेटी पेटवली हाेती. शेकाेटीची आग मनाेहर झाेपला असलेल्या मंडपापर्यंत पाेहाेचली. लागलीच अंथरुणात टाकलेल्या तणशीने पेट घेतला. यात मनाेहर जळून खाक झाला. त्यांचा साथीदार जयदेव याने ही बाब गावकऱ्यांना रविवारी सकाळी सांगितली.
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गावकऱ्यांनी घटनास्थळी माेठी गर्दी केली हाेती. तणशीला आग लागल्याने मनाेहरचा मृत्यू झाला असल्याचे त्याचा साथीदार जयदेव सांगत असला तरी मनाेहरच्या नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. झाेपडीला आग लागल्यानंतरही मनाेहर कसा काय उठला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या शरीरावर घाव आढळून आले असून, त्याला ठार मारल्यानंतर झाेपडीला आग लावण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पाेलिसांनी तपास करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
News - Gadchiroli